शासकीय कार्यालय म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जुन्या फाईल्सचा ढीग, टेबल, खुर्च्या असं साधारपणपणे चित्र उभं राहतं. काही वर्षांपूर्वी आपल्याला एखादा दाखला काढण्यासाठी किंवा तत्सम कामासंदर्भात अशा कार्यालयात अनेकदा चकरा माराव्या लागत होत्या. त्यामुळे वेळ आणि ऊर्जा खर्च होत होती. मात्र, अलिकडे प्रशासनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्यापासून या त्रासापासून आपली सुटका झाली आहे.

विविध प्रकारच्या प्रशासकीय कामांसाठी आता ऑनलाईन पोर्टल्स विकसित झाली आहेत. शिवाय अनेक सेवांसाठी मोबाईल ऍप्सही विकसित झाल्या आहेत. याचाच अर्थ बहुतेक सेवा-सुविधा आपल्या हातात आल्या आहेत. आता याही पलिकडे जाऊन नागरिकांनाच शासनामध्ये सहभागी करून घेण्यात येत आहे. कारण शासकीय यंत्रणेची व्याप्ती जेवढी मोठी तेवढेच तेथे पायाभूत आणि अत्याधुनिक सुविधा पुरविण्याचे आणि ते सांभाळण्याचे, देखभाल, दुरुस्तीचे आव्हानही मोठे असते.

सुमारे २४ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रफळावर वसलेल्या आणि तब्बल ३५ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या पुणे शहराला सर्व सुविधा पुरविणे आणि त्यांची देखभाल, दुरुस्ती करणे हे मोठेच आव्हान आहे. या आव्हानावर मात करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने नागरिक केंद्रित यंत्रणा उभ्या केल्या आहेत. म्हणजेच तुम्हाला महानगरपालिकेशी संबंधित एखाद्या सेवेबाबत किंवा सुविधेबाबत तक्रार करायची असेल तर त्यासाठी सहज, सोपी आणि साधी माध्यमे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

This slideshow requires JavaScript.

नागरिकांना महापालिकेच्या सेवेबद्दल तक्रारी करण्यासाठी टोल फ्री क्रमांक, स्वतंत्र वेबसाईट, एसएमएस, व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर, ई-मेल, मोबाईल अॅप आदी माध्यमे उपलब्ध करून दिली आहेत. या माध्यमातून नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचे योग्य प्रकारे, विहित कालावधीत निराकरण केले जाते. पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा इत्यादी अनेक बाबींसंदर्भात या माध्यमातून नागरिक तक्रार किंवा सूचना करू शकतात.

याशिवाय नागरिक पुणे महानगरपालिकेच्या विविध ऑनलाईन सेवा-सुविधांचा लाभही घेऊ शकतात. पुणे महानगरपालिकेचा हा संपूर्ण प्रकल्प म्हणजे पीएमसी केअर. (PMC CARE (Citizen Assistance Response Engagement)).

गेल्या दोन वर्षांपासून पुणे महानगरपालिकेत हा प्रकल्प यशस्वीपणे कार्यरत आहे. आता या प्रकल्पात आणखी सुधारणा झाल्या असून पीएमसी केअर २.० हा प्रकल्प कार्यन्वित होत आहे. या नव्या सुधारणांमध्ये सहज, सोप्या, सुलभ माध्यमातून नागरिकांच्या अधिकाधिक सहभागाकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासाठी नागरिकांना https://www.pmccare.in/ हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

त्यामध्ये तक्रार किंवा सूचना करण्याची सुविधा, महानगरपालिकेच्या सेवांच्या लिंक्स, मतचाचणी, चर्चेसाठीचे व्यासपीठ, समाजोपयोगी कार्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन आदी घटकांचा समावेश आहे. तसेच तुमच्या नजीकची सार्वजनिक ठिकाणे जसे की प्रभाग कार्यालये, सरकारी कार्यालये, रुग्णालये, कचरापेट्या, सार्वजनिक शौचालये, वारसा स्थळे आदी ३२ प्रकारच्या बाबी थेट नकाशावर पाहण्याची सुविधा आहे. याशिवाय जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, झोन दाखलाही या संकेतस्थळाद्वारे प्राप्त करता येतो. नागरिकांना लॉग-इन करून या सर्व सुविधांचा लाभ घेता येणार आहे.