माणसाच्या प्रगतीचा वेग क्षणाक्षणाला वाढताना दिसत आहे. विशेषत: महानगरातील लोकसंख्येला आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. आवश्यक त्याठिकाणी नैसर्गिक संसाधनांचा वापर करणेही अनिवार्य ठरत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर निसर्गाचा समतोल साधून प्रगती करणे हे मोठे आव्हान ठरत चालले आहे.

त्यामुळेच दैनंदिन जीवन जगताना आणि वेगाने प्रगती साधताना पर्यावरणाचा समतोल बिघडू न देता पर्यावरणाचे संतुलन राखणे काळाची गरज बनली आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेने पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी `इंद्रधनुष्य’ या पर्यावरण व  नागरिक शिक्षण केंद्राची निर्मिती केली आहे.

या केंद्राद्वारे नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात येते. तसेच त्यांच्या मनामध्ये पर्यावरणाविषयी आपुलकी व जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येतो.

संपुर्ण समाजात पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रसारित करणे, नागरिकांमध्ये पर्यावरण साक्षरता वाढविणे तसेच शहरातील पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आवश्यक कौशल्ये व दृष्टीकोन विकसित करणे हा इंद्रधनुष्यचा प्रमुख उद्देश आहे.

indradhanush-pmc-environment-public-facility
PMC Indradhanush: Creating environmental awareness and responsible citizenship

इंद्रधनुष्यची भूमिका व जबाबदाऱ्या 

 • पर्यावरणविषयक शिक्षण
 • पर्यावरणविषयक माहिती देणे
 • पर्यावरणाचा प्रसार
 • नागरिकांसाठी व्यासपीठ
 • पर्यावरण संगोपन

माहिती केंद्र (इंटरप्रिटेशन सेंटर)

इंद्रधनुष्य केंद्राची रचना करताना पर्यावरण ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. याठिकाणी थ्रीडी प्रदर्शने, पॅनल्स, माहिती फलक, विविध उपक्रम, चित्रपट इत्यादीचा आधार घेत पुणे शहरातील यंत्रणा, त्याचा पर्यावरणाशी असलेला संबंध व पर्यावरणाला हानी न पोचविता नागरी व्यवस्था सुरळित चालण्यासाठी नागरिकांचा आवश्यक सहभाग याविषयीची प्रबोधन करण्यात आले आहे. सभागृहात मांडण्यात आलेल्या विविध संकल्पनांमधून शहराच्या भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाची झलक दिसून येते.

इंद्रधनुष्य माहिती केंद्रातील प्रदर्शनात खालील विषयांची माहिती देण्यात आली आहे-

 • पुणे शहराचा इतिहास आणि वारसा
 • स्थानिक शहर प्रशासन
 • शहरी जैवविविधता आणि इको-सिस्टीम
 • पाणी आणि कचरा पाणी व्यवस्थापन
 • स्वच्छता
 • घनकचरा व्यवस्थापन
 • रहदारी आणि वाहतूक
 • ऊर्जा आणि हवामानातील बदल

बांधकाम रचना :

इंद्रधनुष्य केंद्राची इमारतीचे बांधकाम पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आले आहे. इमारतीच्या भोवतालचा परिसर हिरवळीने वेढलेला असून ही इमारत बांधताना कोणत्याही झाडाला धक्का पोचणार नाही ही काळजी घेण्यात आलेली आहे.

 • ग्रंथालय: इंद्रधनुष्यच्या ग्रंथालयात नागरिकांसाठी विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
 • सभागृह : इंद्रधनुष्यच्या सभागृहामध्ये एकावेळी सुमारे 70 ते 80 लोक बसू शकतात. याठिकाणी प्रोजेक्टरची सुविधा असून पर्यावरणविषयक चित्रपट, माहितीपट, प्रेझेंटेशन्स आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
 • मोकळी जागा: इंद्रधनुष्यचा संपुर्ण हिरवागार आणि प्रसन्न परिसर पाहण्याजोगा आहे. या परिसरात असणाऱ्या प्रत्येक झाडावर त्याचे सामान्य नाव, वैज्ञानिक नाव आणि उपयोग इत्यादी गोष्टींची माहिती देणारा फलक आहे. यातून नागरिकांना वृक्षांबाबत अधिक सुशिक्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
 • याशिवाय, इकोफ्रेंडली संकल्पनांचा विस्तार करण्यासाठी लवकरच गांडूळखत, रेनवॉटर हार्वेस्टिंगसारखे उपक्रम राबविण्याचा इंद्रधनुष्यचा मानस आहे.

उपक्रम:

इंद्रधनुष्य केंद्रामध्ये इतर नागरिक व सामाजिक संस्थांना विविध पर्यावरणविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मदत केली जाते. या सभागृहात पर्यावरणाशी निगडीत विविध विषयांवर चित्रपट, माहितीपट दाखविले जातात. तसेच, नैमित्तिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. या केंद्राकडे नागरिक पर्यावरणाबाबतच्या माहितीचा आणि जनजागृतीचा महत्त्वपूर्ण स्रोत म्हणून पाहतात.

पर्यावरणाशी निगडीत उपक्रमांसाठी मोफत सभागृह उपलब्ध करुन दिले जाते.

अनेक परदेशातील विद्यार्थीदेखील इंद्रधनुष्यला भेट देतात. या भेटीत त्यांना पुण्याच्या पर्यावरणाविषयी माहिती दिली जाते.

चला, आपणही एकदा या केंद्राला भेट देऊयात आणि पुण्याच्या पर्यावरणाविषयी माहिती घेऊयात.

पत्ता:

तेंडुलकर जॉगिंग पार्क समोर, अनंत कान्हेरे पथ , दत्तवाडी , पुणे , महाराष्ट्र ४११०३०