समृद्ध, संपन्न आणि सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी स्वच्छता हा अविभाज्य घटक आहे. स्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य टिकून राहते आणि त्यातून विकासाला गती मिळते. त्यामुळेच प्राचीन काळापासून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. संतांनीही अभंग, ओव्या आणि इतर अनेक रंजक माध्यमातून स्वच्छतेचे महत्व अधोरेखित केले आहे.

संत तुकडोजी महाराज ग्रामगीतेतील बाराव्या अध्यायातील 47 आणि 48 व्या ओव्यांत म्हणतात,

मी समजतो गावहि शरीर।
त्यास राखावे नेहमी पवित्र। 
त्यानेच नांदेल सर्वत्र आनंद गावी॥
जैसे आपण स्नान करावे। 
तैसे गांवहि स्वच्छ ठेवीत जावे। 
सर्वचि लोकांनी झिजूनि घ्यावे। 
श्रेय गावाच्या उन्नतीचे॥

अशा पद्धतीने गावाच्या विकासातील स्वच्छतेचे महत्त्व तुकडोजी महाराजांनी पटवून दिले आहे.

आजही सर्व पातळीवर स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. त्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. पुणे महानगरपालिकेने स्वच्छतेच्या क्षेत्रात काम करणार्‍या मान्यवर व्यक्ती, संस्थांचा सन्मान करण्याचा उपक्रम उपक्रम हाती घेतला आहे.

Pune-Swachh-Awards-2018-Swachh-bharat
Swachh Awards 2018

सुमारे ४० लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या पुणे शहराचा गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने विकास होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याला स्वच्छ शहर बनविण्यासाठी तसेच शहराचे भविष्य घडविण्यासाठी शहरात वेळोवेळी विविध उपक्रम राबविले जातात.

याशिवाय, शहरातील अनेक खासगी/सार्वजनिक संस्था, सामाजिक संस्था व कंपन्या शहरातील आरोग्य व स्वच्छतेची स्थिती सुधारण्यासाठी सातत्याने अनेक अभिनव उपक्रम राबवित असतात. या सर्व घटकांच्या कार्याला प्रोत्साहन देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी तसेच स्वच्छतेबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांना पुरस्कार देणे आवश्यक आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे.

या पुरस्काराच्या माध्यमातून पुणे शहरात स्वच्छता आणि आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी सर्वोत्तम आणि अभिनव उपाययोजना राबविणाऱ्या घटकांचा (व्यक्ती/ संघटना/ अधिकारी) सन्मान करण्याचा हेतू आहे. यासाठी विविध श्रेणींमध्ये होणाऱ्या नामनिर्देशनाच्या आधारे पुरस्कारार्थींची निवड केली जाणार आहे. यासाठी गुणांकन करणाऱ्या परीक्षकांमध्ये स्वच्छता क्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ,  स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. पुरस्कार वितरणाचा सोहळा 26 जानेवारी 2018 रोजी पार पडणार आहे.

Pune-Swachh-Awards-2018-Swachh-bharat
Swachh Awards 2018 Prize

पुरस्काराची उद्दिष्टे

–           स्वच्छता व आरोग्य क्षेत्रात विविध कामी हाते घेणाऱ्या घटकांना प्रेरित करणे

–           सर्व प्रभागांमधील घटकांनी स्वच्छ दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी त्यांच्यात सकारात्मक आणि स्पर्धात्मक भावना निर्माण करणे

–           प्रभावशाली व आदर्श कल्पना प्रकाशझोतात आणणे

–           सर्व घटकांमध्ये आपापसात माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी मंच तयार करणे

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख- १५ डिसेंबर २०१७

विजेत्यांची घोषणा- २० जानेवारी २०१८

सत्कार समारंभ- २६ जानेवारी २०१८

पुरस्कार

कुटुंब, गृहनिर्माण सोसायटी, शाळा/महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक क्षेत्र, खासगी क्षेत्र या विभागांत ही स्पर्धा होणार असून या सर्व विभागांतील विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा: https://pmc.gov.in/mr/swachhpuraskar