समाजातील विविध व्यक्ती, संस्था विविध क्षेत्रात समाजहितासाठी सातत्याने काम करीत असतात. पुणे महानगरपालिका पुणे शहरात सामाजिक, आरोग्य, क्रीडा, शिक्षण, संग्रहालय, ग्रंथालय, बेवारस, भिकारी यांच्यासाठी सामाजिक बांधिलकीपोटी कार्यरत असणाऱ्या संस्थांना दरवर्षी आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देते. समाजासाठी निःस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या घटकांना प्रोत्साहन मिळावे हा पुणे महानगरपालिकेचा हेतू आहे.

या प्रक्रियेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी इच्छुक संस्थांचे अर्ज दरवर्षी १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान स्वीकारले जातात. अर्जाची प्रक्रिया आणखी सोपी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने या अर्जाचा नमुना ऑनलाईन उपलब्ध करुन दिला आहे. इच्छुक संस्थांना पुणे महानगरपालिकेच्या http://pmc.gov.in या संकेतस्थळावरुन अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर करता येतील.

खालील क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या संस्थांना पुणे महानगरपालिकेकडून देणगी दिली जाते:
• अंध, मुक- बधिर व अपंग मुलांना प्राथमिक शिक्षण देणे आणि सांभाळ करणे
• संग्रहालये, तांत्रिक शाळा, वाचनालये तसेच औद्योगिक शाळांमध्ये माध्यमिक शिक्षणाची सुविधा पुरविणे अथवा संबंधित इमारत बांधणे
• व्यायामशाळा आणि क्रीडामंदीरे
• सामाजिक सेवा, बालकल्याण केंद्रे, आरोग्य केंद्रे, महिला संबंधित पुर्व प्राथमिक शाळा, बालक्रीडा केंद्रे, बालवाचनालये इत्यादी
• बेवारशी वा गुन्हेगार व्यक्ती, पतित स्त्रिया आणि भिकारी यांच्यासाठीचे कल्याणकारी उपक्रम
• रुग्णालये, दवाखाने, कुष्ठरोग केंद्रे, वेड्यांची इस्पितळे, प्रसुतिगृहे यांना वैद्यकीय मदत

देणगी अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे:
१. अर्ज (संस्थेच्या लेटर हेडवर)
२. नोंदणी दाखला (धर्मादाय आयुक्त)
३. घटना (सत्यप्रत)
४. मागील तीन वर्षांचा कामाचा अहवाल
५. मागील तीन वर्षांचा ऑडीट अहवाल
६. मान्य देणगीच्या दुप्पट रकमेचे कोटेशन
७. माननीय महानगरपालिका दोन सदस्याचे नेमणूक पत्र
८. देणगीविषयी करारनामा करणेविषयी संमतीपत्र

नियम व अटी:
१. देणगी प्राप्त करु इच्छिणाऱ्या संस्थेची मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र शासन यांच्याकडे तीन वर्षांपुर्वी संस्थेची नोंद झालेली असावी.
२. जर एखाद्या संस्थेस शासनाचे अनुदान मिळत असेल तर देणगी दिली जात नाही.
३. संस्था व संस्थेचे सामाजिक कार्य पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतच असावे.